‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय — मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) : महावितरणच्या विविध विभागांमध्ये महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांनी आपल्या कामातून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त महावितरणच्या विविध विभागांतर्फे आयोजित ‘सन्मान सौदामिनीचा’ या विशेष कार्यक्रमात खामगाव येथे १७ ऑक्टोबर रोजी महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा आणि कलागुणांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, श्री. थानवी, मंगलसिंग चव्हाण, श्री. खराटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे म्हणाले की, तंत्रज्ञ (टेक्निशियन) आणि ऑपरेटर पदांवर कार्यरत असलेल्या महिलांनी आव्हानात्मक कामांमध्येही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पोलवर चढण्यापासून ते विविध तांत्रिक कामे यशस्वीपणे पार पाडण्यापर्यंत महिला कर्मचारी अग्रेसर आहेत.

महावितरणने ‘झिरो अपघात’ हे मिशन हाती घेतले असून, सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही बनसोडे यांनी केले. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणे आणि सुदृढ आरोग्य राखणे यामुळे कुटुंबासह संस्थेलाही बळ मिळते, असा संदेश त्यांनी या कार्यक्रमातून दिला. यावेळी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. बुलडाणा जिल्ह्यातील विविध विभागांमध्येही ‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रम आयोजित करून महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. महावितरणमध्ये कार्यरत महिला अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Share This Article
Exit mobile version