-बेरोजगार युवकांनी कर्ज काढून उभी केलेली स्वप्ने आगीत भस्मसात; कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने दोन्ही कुटुंबे हवालदिल
सुलतानपूर (वाजिद खान) : ऐन दुष्काळात आधीच जगणे कठीण झाले असताना सुलतानपूर येथील दोन कष्टकरी कुटुंबांवर शनिवारी पहाटे मोठे संकट कोसळले. जालना रोडवरील दोन दुकानांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल, फर्निचर आणि मशिनरी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत सुमारे ८७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, तुळजाभवानी साडी सेंटरचे सुमारे ४२ लाख रुपये, तर सतीश मशिनरीजचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही दुकानांचे मिळून ८७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे, बँकेचे धनादेश आणि शाळेशी संबंधित कागदपत्रांसह अन्य महत्त्वाची कागदपत्रेही या आगीत जळून खाक झाली आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानीसोबतच महत्त्वाच्या दस्तऐवजांचेही नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय
वीज वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
अग्निशमन दलाच्या विलंबाबाबत नागरिकांच्या तक्रारी
आगीची माहिती दोन अग्निशमन दलांना देण्यात आली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्या नाहीत, तसेच एका गाडीच्या पाण्याच्या पंपात बिघाड असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले असते, तर काही प्रमाणात नुकसान टाळता आले असते, अशी हळहळ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर तेजनकर आणि महसूल अधिकारी पवन बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
कर्ज फेडायचे कसे? दोन्ही कुटुंबांसमोर मोठे संकट
दोन्ही युवकांनी कर्ज काढून आणि मेहनतीच्या बळावर आपले व्यवसाय उभे केले होते. मात्र, आगीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना या आगीमुळे दोन्ही कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि पुन्हा नव्याने उभे राहायचे कसे, या चिंतेने दोन्ही कुटुंबे हवालदिल झाली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी अंबादास जुमडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

