-३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे उद्दिष्ट; पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेची विशेष तपासणी पथके
पिंपरी (महिंद्र हिवळे) : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविता यावा, यासाठी पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
काय बंद? काय सुरू?
१) गाड्या धुणे आणि स्वच्छतेसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई
पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणे, टेरेस आणि अंगण स्वच्छ करणे तसेच उद्याने व हिरवळीसाठी पाणी वापरणे टाळावे.
२) सोसायट्यांसाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर बंधनकारक
गृहनिर्माण सोसायट्यांनी झाडे आणि उद्यानांसाठी एसटीपी व जीटीपीमधील प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
३) सर्व्हिस सेंटरमधील अनधिकृत वापरावर कारवाई
सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृतरीत्या पिण्याचे पाणी वापरल्याचे आढळल्यास नळजोड बंद करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
४) विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा केल्यास दंड
महापालिकेच्या नळजोडाला विद्युत पंप लावून पाणी उपसा केल्यास संबंधित पंप जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
५) नवीन नळजोडांवर मर्यादा
नवीन गृहप्रकल्पांना मर्यादित व्यासाचे नळजोड दिले जाणार आहेत. तसेच वॉशिंग सेंटर आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत.
६) बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर
बांधकाम व्यावसायिकांनी बोअरवेलचे पाणी वापरण्याऐवजी महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
७) नदीतून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई
नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसा करून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांनी हा प्रकार थांबवावा. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
पाणी बचत करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान
पाण्याचा काटकसरीने वापर करणाऱ्या सोसायट्यांचा महापालिकेकडून सन्मान करण्यात येणार आहे. पाण्याची बचत ही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महत्त्वाची असल्याचे नमूद करत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
“आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची पाणी सुरक्षितता निश्चित करेल. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

