-समान काम-समान वेतनाची मागणी; १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा
लोणार (वाजिद खान) : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी लोणार येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरासह जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. शासनाकडून मागणीबाबत निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
वेतनश्रेणीतील समानतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला होता. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

