-शेतात पिकाला पाणी देताना वीजपुरवठा खंडित; डीपीजवळ फ्यूज तपासत असताना घडली दुर्घटना
बिबी (ऋषी दंदाले) : शेतात पिकाला पाणी देत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने डीपीचा फ्यूज तपासण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बिबी शिवारात घडली. ही घटना शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गोवर्धन नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील रहिवासी गोविंद आयदान राठोड हे शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी बिबी शिवारातील गट क्रमांक ३८८ मधील आपल्या शेतात पराटीच्या (कापूस) पिकाला पाणी देत होते. पाणी देण्याचे काम सुरू असतानाच अचानक शेतातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज का गेली, हे पाहण्यासाठी गोविंद राठोड शेताजवळील वीज वितरण डीपीजवळ गेले. डीपीमधील फ्यूज काढून तपासत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. हा धक्का इतका जोरदार होता की, ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत गोविंद राठोड यांचे मेव्हणे संजय टोपा राठोड (वय ४५, रा. गोवर्धन नगर, ता. लोणार) यांनी बिबी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बिबी पोलिसांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १५.४८ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची नोंद कायमी मर्ग क्रमांक २७/२०२६ अशी आहे. बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण (ब.नं. १७६५) पुढील तपास करीत आहेत. शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गोवर्धन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

