संस्कारांची शिदोरी सोबत असली की जीवनाला आधार मिळतो : सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-एकता नवदुर्गा मंडळाच्या नवरात्रोत्सवात प्रबोधनपर प्रवचन; स्पर्धांतील विजेत्या महिला व युवतींना बक्षीस वितरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : प्रत्येक घरात संस्कारांना महत्त्वाचे स्थान असते. आपल्यावर सर्वप्रथम संस्कार आई-वडील करतात. आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार समाजात आणि गावात वावरताना उपयोगी पडतात. संस्कारांची शिदोरी सोबत असली की जीवनाला आधार मिळतो, असे प्रबोधन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी नवरात्रोत्सवानिमित्त एकता नवदुर्गा मंडळात आयोजित प्रवचनातून केले.

या देशात अनेक शूरवीर महिला होऊन गेल्या. त्यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावून संघर्ष केला, तर अनेक मातांनी देशासाठी शूरवीर पुत्र घडवून अर्पण केले. यामध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिवा काशीद यांच्या मातेसह अनेक महान मातांचा समावेश आहे. इतिहासाची पाने चाळताना शूरवीर महिलांचे योगदान लक्षात येते. त्यांच्या कार्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. नवरात्रात देवीची उपासना करा; मात्र महिलांचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे विचार सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.

एकता नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित संगीत खुर्ची आणि रांगोळी स्पर्धांतील विजेत्या महिला व युवतींना सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. प्रास्ताविकात शिवदास ढोलेकर यांनी शिवा काशीद यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांना कशा प्रकारे घडविले, याचा इतिहास विशद केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यामध्ये ऋतीक बोबडे यांनी सहभाग घेतला. यावेळी कैलास ढोलेकर आणि अंजली ढोलेकर यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुनील रिंढे, डॉ. भागवत सुरुशे, कोंडूबा जाधव, शिवाजी जाधव, संतोष बोबडे, रामकृष्ण मिस्त्री, श्रीकांत पऱ्हाड, नरेंद्र सुरळकर, बबलू पवार, पवन जाधव, सुधाकर पऱ्हाड, रविंद्र पऱ्हाड, ओम जाधव, हर्षल धुळे, देवांश जैस्वाल, तेजस पंचाळ, अनंता बोंडफळे, प्रेम पऱ्हाड यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version