– अमरावती शिक्षक मतदारसंघ; प्रा. आदितीताईंच्या विजयाची शक्यता पाहता विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र!
– विजयानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करण्यासाठी लढण्याची ग्वाही!
अमरावती/बुलढाणा (खास प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार प्रा. आदितीताई पोहरे यांच्यात मुख्य लढत स्पष्ट दिसत असली, तरी या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अतिशय गुंतागुंतीची झाली आहेत. महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी, अपक्ष उमेदवारांचा भरणा आणि पसंतीक्रमाच्या मतांचे राजकारण या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रा. आदितीताई पोहरे यांच्या विजयाची गणिते जुळून येऊ लागली आहेत. त्यामुळेच त्यांच्याबाबत विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे दिसून येत आहे. विजयी झाल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करण्यासाठी लढा देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
दुसरीकडे, महायुतीकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक पुन्हा नशीब आजमावत असले, तरी महायुतीतील घटक पक्षांमधील धुसफूस त्यांच्या अडचणी वाढवणारी ठरत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या संगीता शिंदे (खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी) यांनी पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपच्या पारंपरिक मतांमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि इतर अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने सत्ताधारी आमदाराच्या विरोधातील तसेच संस्थात्मक पातळीवरील मते मोठ्या प्रमाणावर विभागली जाण्याची शक्यता आहे. महायुतीतील या बंडखोरीचा आणि अंतर्गत समन्वयाच्या अभावाचा फायदा काँग्रेसच्या प्रा. आदितीताई पोहरे यांना मिळू शकतो.
शिक्षक मतदारसंघातील निवडणूक केवळ राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढली जात नसून, ती पसंतीक्रमाच्या मतांवरही अवलंबून असते. पहिल्या पसंतीची मते मिळवतानाच, इतर अपक्ष किंवा विरोधी उमेदवार बाद झाल्यानंतर हस्तांतरित होणारी दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मते अत्यंत निर्णायक ठरतात. प्रा. आदितीताई पोहरे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, जुनी पेन्शन योजना आणि विनाअनुदानित शाळांचे प्रश्न यांबाबत घेतलेली ठाम भूमिका शिक्षक मतदारांना आकर्षित करत असल्याचे चित्र आहे. पहिल्या आणि पुढील पसंतीक्रमांची मते आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसच्या रणनीतीकारांना यश आले, तर प्रा. पोहरे यांच्या विजयाची शक्यता वाढू शकते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रा. दत्तात्रय (डी. एस.) लहाने अपक्ष म्हणून रिंगणात असले, तरी महाविकास आघाडीतील बहुतांश घटक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. शिक्षकांमधील बदलाची अपेक्षा असलेला वर्ग, तटस्थ मतदार आणि विविध शिक्षक संघटनांचे पाठबळ मिळवून प्रा. आदितीताई पोहरे मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरल्यास अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला यश मिळू शकते.
महायुतीतील अंतर्गत फूट, शिवाजी शिक्षण संस्थेतील ५,५०० हून अधिक शिक्षक मतदारांचे संभाव्य पाठबळ आणि विरोधी मतांचे विभाजन या तीन प्रमुख घटकांचा राजकीय लाभ उठवून प्रा. आदिती पोहरे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात बाजी मारू शकतात, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. सद्या तरी, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांतून त्यांचे पारडे जड दिसून येत आहे.
सासरे तथा ‘देशोन्नती’कार प्रकाश पोहरे यांच्या अनेक भूमिकेशी आदितीताई पोहरे नेहमीच असहमत!
प्रा. आदितीताई पोहरे या स्वतंत्र विचारसरणीच्या उच्चशिक्षित महिला नेत्या आहेत. ‘देशोन्नती’कार प्रकाशभाऊ पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, सरकारी नोकरदारांचे वेतन आणि तत्सम बाबींवरही त्यांनी आपल्या लेखणीतून परखड मते मांडली आहेत. प्रा. आदितीताई पोहरे या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सासरे प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मतांशी सहमत असल्या, तरी शासकीय नोकरदार आणि शिक्षकांसंदर्भातील प्रकाशभाऊंच्या वैयक्तिक मतांबाबत मात्र त्या त्यांच्या मतांशी अजिबात सहमत नाहीत. त्या स्वतः प्राध्यापिका असल्याने त्यांना शिक्षकांच्या समस्या व अडचणींची सखोल जाण आहे. त्यामुळे वेळप्रसंगी त्यांनी ‘देशोन्नती’कारांच्या अनेक मतांना उघडपणे विरोधही केला आहे. याच भूमिकेमुळे विदर्भातील शिक्षक आणि विविध शिक्षक संघटना या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

