आरटीओ चलानाच्या नावाने एपीके फाईल पाठवून २४ लाखांची फसवणूक; जामतारा परिसरातून दोघांना अटक

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-मोबाईलचा अॅक्सेस मिळवून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून रक्कम वर्ग; आळंदी पोलिसांची झारखंडमध्ये कारवाई

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आरटीओ चलानाच्या नावाने एपीके फाईल पाठवून मोबाईलचा अॅक्सेस मिळवला आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये परस्पर वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोघांना आळंदी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा परिसरातून अटक केली आहे.

आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक फिर्यादी आहेत. ते महिंद्रा पिकअप वाहनातून भाजीपाल्याची वाहतूक करतात. त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘आरटीओ चलान’ नावाची एपीके फाईल आली होती. आपल्या वाहनावर दंड आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. मोबाईलमधील तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांनंतर त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश आले. बँक स्टेटमेंट तपासले असता, खात्यातील ७० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडण्यात आल्याचे आणि त्यापैकी २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील फसवणूक टाळण्यासाठी बँकेने संबंधित खाते तातडीने होल्ड केले. तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याचा माग काढत विष्णुप्रसाद प्रसादी वर्मा (वय २५, रा. देवपूर, जि. गिरीडीह, झारखंड) आणि विनोद एतवारी मंडल (वय ४२, रा. तिलकडीह, जि. गिरीडीह, झारखंड) यांना अटक केली.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणुकीची रक्कम स्वीकारली

पोलिसांच्या चौकशीत फसवणुकीची पद्धत समोर आली. विनोद मंडल हा क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेत भरता न येणाऱ्या गरजू कार्डधारकांकडून कार्ड मिळवत असे. ‘तुमच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट करून देतो आणि मुदत वाढवून देतो,’ असे सांगून तो त्यांच्याकडून कार्ड घेत असे. त्यानंतर ही कार्डे विष्णुप्रसाद वर्माकडे दिली जात होती. वर्मा एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलचा अॅक्सेस मिळवून इतरांच्या खात्यांतून आलेली फसवणुकीची रक्कम या क्रेडिट कार्डद्वारे स्वीकारत असे. फसवणुकीची रक्कम क्रेडिट कार्डमध्ये जमा झाल्यानंतर ती विविध माध्यमांतून काढून घेतली जात होती. त्यामुळे संबंधित कार्डधारकाला काही काळ क्रेडिट कार्डच्या देयकासाठी मुदतवाढ मिळत असली, तरी फसवणुकीची रक्कम स्वीकारल्यामुळे त्याचे कार्ड ब्लॉक होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींना झारखंडमधील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून दोन मोबाईल, पाच क्रेडिट कार्ड, दोन क्रेडिट कार्डच्या छायांकित प्रती, एसबीआय बँकेचे स्टेटमेंट आणि विविध बँक खात्यांचे पासवर्ड असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील इतर सहआरोपी, विविध बँक खाती तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड आरोपींना कोठून मिळाले, याचा तपास सुरू आहे.

अनोळखी व्यक्तींना क्रेडिट कार्ड देऊ नका

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांना आवाहन केले आहे की, क्रेडिट कार्डचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा त्याची मुदत वाढवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी व्यक्तीला क्रेडिट कार्ड देऊ नये. अशा कार्डचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी केला जाऊ शकतो.

आळंदी पोलिसांच्या पथकाची कारवाई

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलीस हवालदार आरती निकम, श्री. साळुंखे, श्री. जगताप यांच्यासह आळंदी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share This Article
Exit mobile version