सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलसुर येथे बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-नारी शक्ती महिला शेतकरी बचत गटाचा पुढाकार; दुष्काळसदृश परिस्थितीत श्रमदानातून जलसंधारणाचा संकल्प

शेलसुर (गजानन रिढे) : दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसंधारणाला चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत चिखली तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेलसुर येथे बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाला श्रमदानातून सुरुवात करण्यात आली. गावातील नारी शक्ती महिला शेतकरी बचत गटाने पुढाकार घेत या उपक्रमाला सुरुवात केली असून, जलसंधारणाच्या कामात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, पाणीसाठवण क्षमता वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याची गरज लक्षात घेता, महिला बचत गटाने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या श्रमदान उपक्रमावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थ, कृषी विभागाच्या मेंटर भागले मॅडम, मृद व जलसंधारण समन्वयक शिवशंकर गव्हाळे तसेच WOTR संस्थेचे परिवर्तन भागीदार गजानन रिंढे उपस्थित होते. गावातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविणे आवश्यक आहे. शेलसुर येथील नारी शक्ती महिला शेतकरी बचत गटाने श्रमदानातून सुरू केलेला हा उपक्रम ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि जलसंवर्धनाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.

जलसंधारणासाठी लोकसहभाग, श्रमदानातून जलसमृद्धी आणि महिला शक्तीचा पुढाकार, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version