-लोणार तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा पहिला दिवस; नवरात्रोत्सवात मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी
लोणार ( वजिद खान) : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या ऐतिहासिक लोणार सरोवरातील प्रसिद्ध कमळजा माता मंदिर यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाखो भाविक दर्शनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत असताना, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश श्रीराम मापारी यांच्यासह पाच जणांनी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज पहिला दिवस आहे.
लोणार सरोवरात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे कमळजा माता मंदिराकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून लाखो भाविक येतात. त्यामुळे यंदाही भाविकांच्या दर्शनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरोवरातील पाणी काढून मंदिर भाविकांसाठी सुरक्षितपणे खुले करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, या गंभीर विषयाकडे संबंधित विभाग आणि प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसून, कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे राजेश मापारी यांनी सांगितले.
भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, या मागणीसाठी नाइलाजास्तव १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान कोणाच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास महसूल विभाग, वन्यजीव विभाग आणि पुरातत्त्व विभाग पूर्णपणे जबाबदार असतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
हे आंदोलक उपोषणाला बसले
राजेश श्रीराम मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य; साहेबराव दशरथ पाटोळे, माजी नगरसेवक; सुरेश समाधान वाठोरे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष; विकास मधुकर मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि गोपी आखाडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

