‘सरकारचं आवतन म्हणजे…’; साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणी आजही कायम — डॉ. राजेंद्र शिंगणे

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-‘विचाराधीन’ असल्याचे मोघम उत्तर देऊन मागणीला बगल; तालुका निर्मितीसाठी भविष्यातही पाठपुरावा सुरूच राहणार

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शासनात मीही काम केले आहे. कोणतीही मागणी केली की ती विचाराधीन असल्याचे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली जाते. साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही आम्हालाही अशीच उत्तरे मिळत गेली. कारण, शासनाचे आवतन म्हणजे जेवण वाढल्याशिवाय काही खरे नाही. साखरखेर्डा तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आजही पाठपुरावा सुरूच राहील. भविष्यात जेव्हा तालुका निर्मिती होईल, तेव्हा साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणी पूर्ण होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे यांनी सुरू केलेल्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर होते.

‘शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता परिस्थितीचा सामना करावा’

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. आज महाराष्ट्रात दररोज २५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करून चालणार नाही; आलेल्या परिस्थितीचा सामना करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. तसेच, कोणी दारात पैसे मागण्यासाठी आले, तर त्याला थांबवा. गरज पडल्यास मी तुमच्या पाठीशी आहे, असेही तुपकर यांनी सांगितले.

ग्रामीण युवकांसाठी क्रीडांगणाची सुविधा महत्त्वाची

ग्रामीण भागातील युवकांना आजही खेळण्यासाठी क्रीडांगणे उपलब्ध नाहीत. साखरखेर्डा येथे स्पोर्ट्स क्लब सुरू करून युवकांना खेळासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती तेजराव बापू देशमुख, अनिल तुपकर, सुरेश तुपकर, शिवसेना नेते ऋषिकेश जाधव, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, जिजामाता विद्यालयाचे संचालक ललित अग्रवाल, पंढरीनाथ टेकाळे, अमित जाधव आणि बबनराव रिंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण हाडे यांनी केले, तर संचालन अजीम नवाज राही यांनी केले.

 

Share This Article
Exit mobile version