‘ज्ञानेशकुमारांना अटक करा; वोटचोर रंगा-बिल्लाला सत्तेवरून खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

काँग्रेसचा आक्रमक इशारा: लोकशाही-संविधान बचाओ आंदोलनासाठी महाराष्ट्रातील नेते दिल्लीच्या रस्त्यावर; मुंबईतही निदर्शने!

नवी दिल्ली | मुंबई (बाळू वानखेडे) – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने मतचोरी (वोट चोरी) केल्याचा थेट आरोप करत काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने देशभर तीव्र आंदोलन छेडले आहे. “जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक केली जात नाही आणि सत्तेत बसलेल्या वोटचोर रंगा-बिल्लाला खाली खेचले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” असा घणाघाती इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘लोकशाही व संविधान बचाओ’ आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, मुंबईत दादर येथील टिळक भवनासमोरही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा लढा मोडीत काढण्यासाठी हुकूमशाही सरकारने राजधानी दिल्लीला लष्करी छावणीचे रूप दिले आहे. ३० हजारांहून अधिक पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, दिल्लीत येणाऱ्या जवळपास २५० रेल्वे गाड्या व मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलन दडपून मतचोरीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे; मात्र काँग्रेस कार्यकर्ता मागे हटणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “’एसआयआर’ (SIR) च्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. ज्ञानेश कुमार यांचे हे कृत्य देशद्रोहासारखे असून, ते केवळ बाहुले (कठपुतली) आहेत; तर या मतचोरीचे खरे सूत्रधार ‘रंगा-बिल्ला’ आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असणे आवश्यक असताना निवडणूक आयुक्तांनी लोकशाहीची पायमल्ली केली आहे.”

या आंदोलनात महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, आमदार भाई जगताप, मोहन जोशी व अतुल लोंढे यांच्यासह राज्यातील अनेक आमदार, माजी लोकप्रतिनिधी व सुमारे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सपकाळ म्हणाले, “इंडिया आघाडीचे नेते आज सरन्यायाधीशांची भेट घेणार होते. सुरुवातीला वेळ दिल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर भेट नाकारण्यात आली. यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे.”

मुंबईत टिळक भवनासमोर निदर्शने

दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दादर येथील काँग्रेस मुख्यालय ‘टिळक भवन’बाहेर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘वोट चोर, गद्दी छोड’, ‘ज्ञानेशकुमार हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देत परिसर परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ॲड. संदेश कोंडविलकर, गुरुमितसिंग बच्छर, दीपक वाघमारे, राघवेंद्र शुक्ला, प्रशांत धुमाळ, दत्ता नांदे व संतोष राऊत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

एमपीएससी घोटाळ्याची चौकशी वेळेत पूर्ण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुद्द्यावरूनही हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. “MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे, याचाच अर्थ ‘दाल में कुछ काला है’. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विचारांच्या माणसाला प्रशासनात बसवण्यासाठीच भिमनवार यांची नियुक्ती केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे एमपीएससीची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. सरकारने आता विहित मुदतीत ही चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

https://x.com/i/broadcasts/1RJjpbnMARpKw

Share This Article
Exit mobile version