कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गुलाबराव खरात यांची बदली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले असून, मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ. भालचंद्र चव्हाण (भाप्रसे) यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर कार्यरत असलेले गुलाब खरात यांच्या जागी चव्हाण पदभार स्वीकारतील. सामान्य प्रशासन विभागाने १२ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. गुलाब खरात यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डाॅ. भालचंद्र चव्हाण हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (भाप्रसे) अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने स्थानिक पातळीवरील विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय कारकीर्द
डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण हे महाराष्ट्र केडरमधील २०१९ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. चव्हाण यांनी बिगर-राज्य नागरी सेवा (नॉन-एससीएस) प्रवर्गातून आयएएस पदापर्यंत मजल मारली. त्यांनी कृषी शाखेत पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. मिळवली असून, त्यांच्याकडे एलएल.बी.ची पदवीदेखील आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) म्हणून काम केले. या पदावरून थेट आयएएस सेवेत नियुक्त होणारे ते पहिले अधिकारी ठरले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव तसेच पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते मुंबई येथे महसूल व वन विभागात संचालक (आपत्ती व्यवस्थापन) या पदावर कार्यरत आहेत.

