वाघापूर फाट्यावर पिल्लासह बिबट्याचा वावर; हल्ल्याच्या प्रयत्नातून दिलीप पाटील थोडक्यात बचावले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सोयाबीन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या जीवाला धोका; वन विभागाने पिंजरा लावून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

चिखली (महिंद्रा हिवाळे) : वाघापूर ते गोद्री मार्गावरील वाघापूर फाट्याजवळ आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने आपल्या पिल्लासह रस्ता ओलांडला. यावेळी रस्त्यावरून जाणारे साकेगाव येथील शेतकरी दिलीप पाटील हे बिबट्याला वाट देण्यासाठी थांबले असता, बिबट्याने मागून येत त्यांच्यावर अचानक झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. या घटनेमुळे अंत्री कोळी, साकेगाव आणि वाघापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

२ ऑक्टोबरलाच दिली होती माहिती; वन विभागाची केवळ पाहणी

या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच २ ऑक्टोबर रोजी वन विभागाला दिली होती. त्यानुसार, वन विभागाच्या पथकाने त्याच रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, अंधारामुळे बिबट्या प्रत्यक्ष दिसला नाही. त्यामुळे पथकाने बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन परतले. त्यानंतर वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्याच ठिकाणी वारंवार बिबट्या दिसत असल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सोयाबीन काढणीच्या हंगामात धोका वाढला

सध्या सोयाबीन काढणी आणि सोंगणीचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर पहाटे पाच-सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करत असतात. अशा परिस्थितीत पिल्लासह बिबट्याचा वावर शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण करणारा ठरू शकतो. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पिंजरा लावा, ट्रॅप कॅमेरे बसवा; शेतकऱ्यांची मागणी

केवळ जनजागृती करून किंवा नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन हा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, ट्रॅप कॅमेरे बसवावेत आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी अंत्री कोळी, साकेगाव आणि वाघापूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. “मी आज बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात बचावलो आहे. वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी एकट्याने शेतात जाऊ नये आणि अत्यंत सावधगिरी बाळगावी,” असे आवाहन साकेगाव येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी केले.

Share This Article
Exit mobile version