– शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक; चुकीच्या नोंदी करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही झाली, तर तीव्र आंदोलनाचा इशारा
– ‘डिजिटल सातबारा’ की प्रशासकीय थट्टा? हळदीच्या पिकाला सोयाबीन दाखवून तलाठ्याने केला शेतकऱ्याचा घात!
चिखली (अंकुश पाटील) : आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा आणि विविध संकटांचा सामना करत हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील शेतकरी गणेश निकम यांच्या एक एकर शेतात हळदीची लागवड झालेली असताना, महसूल प्रशासनाने पीक पाहणी (पीक पेरा) नोंदीमध्ये मात्र थेट ‘सोयाबीन’ पिकाची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अजब कारभारामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि डिजिटल पीक पेरा नोंदीच्या अचूकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या या निव्वळ हलगर्जीपणामुळे संबंधित शेतकरी कायदेशीर व प्रशासकीय अडचणीत सापडला आहे. पीक पेऱ्यातील या चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्याला पीक कर्ज, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई अशा तिन्ही मुख्य शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाताच किंवा निष्काळजीपणे ही नोंद केल्याचा आरोप आता होत आहे.
“शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अशा महसूल कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही तर तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल.”
— रविकांत तुपकर, शेतकरी नेते
“संबंधित शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. तांत्रिक बाबी त्वरित पूर्ण करून पीक पेऱ्यातील नोंद दुरुस्त केली जाईल. तसेच, या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
— तहसीलदार, चिखली
शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, प्रत्यक्ष पिकापेक्षा कागदावरील नोंद भलतीच निघाल्याने तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. आता तहसीलदारांच्या आश्वासनानंतर ही चूक किती लवकर दुरुस्त होते, याकडे लक्ष लागले आहे.

