दिल्लीत ‘अघोषित आणीबाणी’: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून रणकंदन; हजारो आंदोलक, बडे नेते अटकेत; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

नवी दिल्ली (आवेश तिवारी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांमधील कथित फेरफारांच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने पुकारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली सध्या एका रणभूमीच्या स्वरूपात बदलली आहे. दिल्ली पोलिसांची अभूतपूर्व फाळणीसदृश सुरक्षा आणि कठोर दडपशाहीमुळे लोकशाही मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.

CJP ने शनिवारी सकाळी १० वाजता जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारत दिल्लीला अक्षरशः छावणीचे स्वरूप दिले. ३८ ते ४० हजारांहून अधिक सुरक्षा दल आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले असून, जंतरमंतरकडे जाणारे रस्ते तीन ते पाच लेयरच्या लोखंडी बॅरिकेड्स आणि स्पाईक लावून सील करण्यात आले आहेत. या प्रचंड सुरक्षा यंत्रणेमुळे CJP चे प्रमुख नेते जंतरमंतरपर्यंत पोहोचू शकले नाहीत. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी पहाटेच विमानतळावर उतरताच ताब्यात घेतले. या कारवाईनंतर आंदोलनाची धुरा सांभाळणारे CJP चे नेते अजिंक्य शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, पोलिसांनी तुम्हाला जिथे अडवले, तीच जागा तुमचे जंतरमंतर बनेल आणि आयुक्तांच्या राजीनाम्यापर्यंत हा लढा सुरूच राहील.

या दडपशाहीचे लोण केवळ CJP पुरते मर्यादित राहिलेले नाही. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते पिनारायी विजयन आणि माणिक सरकार यांसह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांनी वाटेतच ताब्यात घेतले. मुंबईत याच मुद्द्यावर निदर्शने करणारे अभिनेते इम्रान खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली मेट्रोचे ४५ हून अधिक स्टेशन बंद ठेवण्यात आले असून, अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने आणि रिटेल दारूची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि काही पत्रकारही पोलिसांच्या कारवाईपासून वाचू शकले नाहीत, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या संपूर्ण कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देशातील सद्यस्थितीला ‘अघोषित आणीबाणी’ असे संबोधले आहे. सोशल मीडियावर एक संदेश जारी करत त्यांनी इशारा दिला आहे की, जर रविवारीपर्यंत आंदोलक नेत्यांची सुटका झाली नाही, तर ते पुन्हा उपोषण किंवा पदयात्रा सुरू करतील. दुसरीकडे, CJP ने आरोप केला आहे की, २०२४ पासून मतदार याद्यांमधून तब्बल १३ कोटी मतदार वगळण्यात आले आहेत आणि सत्ताधारी व विरोधकांमधील मतांची सूक्ष्म दरी भरून काढण्यासाठी हा कथित खेळ सुरू आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत सर्व निर्णय सर्वसंमतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे.


दरम्यान, या जनक्षोभाच्या आणि दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकांवर रविवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. मेट्रो आणि वाहतूक सेवेवरील निर्बंध, तसेच प्रशासकीय कारवाई विरोधातील याचिकेवर न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.

Share This Article
Exit mobile version