-शेतकरी नेते सहदेव लाड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा जिल्ह्यातील बँकांसमोर आंदोलनाचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) : सातबारावर वैयक्तिक कर्जाचा बोजा असणाऱ्या शेतकऱ्यांनाही नवीन पीक कर्ज देण्यात यावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शेतकरी नेते सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या वतीने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर उद्योगधंद्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा बोजा नोंदवलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बँका अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी उद्योगधंदा उभारण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या पीक कर्जापासून वंचित ठेवू नये. सातबारा उताऱ्यावर वैयक्तिक कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांनाही नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सहदेव लाड यांनी केली आहे. या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपातील अडचणी दूर कराव्यात. अन्यथा जिल्ह्यातील बँकांसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सहदेव लाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.