आळंदीत दिव्यांगांना मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर मोफत

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-२३ ऑक्टोबर रोजी शिबिर; पूर्वनोंदणीसाठी ९८२०५९९१०८ / ९३७१०८८९११ या क्रमांकावर संपर्काचे आवाहन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर बसविण्यासाठी मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, इच्छुकांनी ९८२०५९९१०८ / ९३७१०८८९११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. शिबिराला येताना आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

कै. आमोद पानसे यांच्या स्मरणार्थ श्रीमती शुभलक्ष्मी पानसे यांच्या देणगीतून, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या सहयोगाने भारत विकास परिषद, कोथरूड शाखा आणि दिव्यांग केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पितळी गणपती मंदिरासमोरील हराळे वैष्णव धर्मशाळेत २३ ऑक्टोबर रोजी हे शिबिर होणार आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मॉड्युलर पाय, कृत्रिम हात तसेच पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक मोजमाप घेण्यात येणार असून, पात्र दिव्यांगांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमाबाबत आळंदी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिव्यांग ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताजी चितळे यांनी प्रस्तावना केली. दिव्यांग ट्रस्टचे विश्वस्त तथा दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची तसेच आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना विनय खटावकर म्हणाले की, कृत्रिम मॉड्युलर पायाची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक, तर कृत्रिम हाताची किंमत २५ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, या शिबिरात मॉड्युलर पाय, कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर दिव्यांग व्यक्तींना पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत.

परंपरागत जयपूर फूटच्या तुलनेत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. हे मॉड्युलर पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे तसेच शेतीची कामे यांसारख्या दैनंदिन क्रिया करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे कृत्रिम हाताच्या साहाय्याने सहा किलोग्रॅमपर्यंतचे वजन उचलता येऊ शकते, अशी माहिती खटावकर यांनी दिली. भारत विकास परिषदेने २०२४ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या १ हजार दिव्यांगांच्या महाशिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. मागील २५ वर्षांत भारत विकास परिषदेच्या माध्यमातून ३५ हजार दिव्यांगांना मॉड्युलर पाय देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिर

दिव्यांग व्यक्तींनी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आळंदी येथील हराळे वैष्णव धर्मशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. शिबिरासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तीसह त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version