-समाजप्रबोधन व वारकरी संप्रदायासाठी केलेल्या कार्याची दखल; ग्रामीण भागातील कलावंतांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समितीच्या सदस्यपदी ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांची निवड करण्यात आली आहे.
राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून समाजप्रबोधनाचा वसा घेत कीर्तनरूपी सेवेतून कार्य करणारे दामोदर उर्फ ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. वारकरी संप्रदाय तसेच भजनी मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. आज प्रत्येक गावात त्यांचा दांडगा संपर्क आहे.
साखरखेर्डा तालुक्याच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले होते. यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण तसेच मुंडण आंदोलनही केले होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ते आजही समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील कलावंतांना राजाश्रय मिळण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील कलावंतांना कलावंत सन्मान योजनेत सहभागी करून घेऊन त्यांना मानधन मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी सांगितले.

