जनावरे नसलेल्या शेतकऱ्यांचे कुटार खरेदी करून पशुपालकांना द्या; चारा वाहतूक निर्बंधामुळे कुटार वाया जाण्याचा धोका!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

शेतकरी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; चिखलीत तहसीलदारांमार्फत पाठवले कुटाराचे नमुने!

चिखली (अंकुश पाटील) : यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यात सोयाबीनचे कुटार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे जनावरे नसल्याने हे कुटार पडून आहे, तर दुसरीकडे पशुपालकांसमोर चारा टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातून चारा आणि पशुखाद्याच्या वाहतूक व विक्रीवर निर्बंध लादण्यात आल्याने हे कुटार वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जनावरे नसलेल्या शेतकऱ्यांकडील कुटार शासनाने योग्य दराने खरेदी करून ते पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली चिखलीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या अनोख्या आंदोलनादरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोतडीभर कुटाराचा नमुनाही प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.

‘कुटार बँक’ आणि थेट अनुदान

चारा छावण्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याऐवजी उपलब्ध कुटाराचा कार्यक्षम वापर करण्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. यासाठी गावपातळीवर ‘कुटार बँक’ किंवा साठवण केंद्रे उभारण्यात यावीत. यामुळे कुटार उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळेल, तर पशुपालकांना वेळेवर चारा उपलब्ध होऊन शासनाच्या निधीचीही मोठी बचत होईल. तसेच, पात्र पशुपालकांना चारा अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर (DBT) वर्ग करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

कुटाराचा अपव्यय थांबवा

“जनावरे नसल्यामुळे अनेक शेतकरी कुटार शेतातच जाळून टाकतात. यामुळे पशुखाद्याचा मोठा अपव्यय होतो. हा अपव्यय थांबवण्यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य दराने कुटार खरेदी करावे किंवा अनुदान देऊन ते स्थानिक पातळीवर पशुपालकांसाठी उपलब्ध करावे.”

— विनायक सरनाईक, क्रांतिकारी शेतकरी संघटना / देविदास कणखर,  शेतकरी संघटना

यावेळी उद्धव थुटे पाटील, नितीन राजपूत, अरुण नेमाने, गजानन पंडित, मुरलीधर येवले, गजानन कुटे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version