पावसाने दडी मारली, विहिरींनी गाठला तळ; आता शेतातील मोटारीही सुरक्षित नाहीत!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-हिरडव शिवारात ५ एचपीची पाण्याची मोटार चोरीला; दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

-“संपूर्ण वर्ष शेतीतून काहीच पिकलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी काय खायचं?” — वैभव भिकाजी गाडे

लोणार (वाजिद खान) : यावर्षी पावसाने वारंवार दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सोयाबीनसारखे नगदी पीक हाताशी येण्याची आशा असताना पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, कमी पावसामुळे अनेक विहिरींनी तळ गाठल्याने पुढील पिके घ्यायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अशा बिकट परिस्थितीत आता शेतातील पाणी उपसण्यासाठी असलेली मोटार आणि शेतीचे साहित्यही चोरीला जाऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

लोणार तालुक्यातील हिरडव शिवारात वैभव भिकाजी गाडे यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेली ५ एचपी क्षमतेची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केली. याशिवाय मोटारीला जोडलेला प्लास्टिकचा सक्शन पाइप तोडून नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आणखी एक धक्का बसला आहे.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोटार लंपास

हिरडव शिवारातील गट क्रमांक २७८ मधील शेतीत विहीर असून, शेतीच्या सिंचनासाठी त्यावर ५ एचपीची पाण्याची मोटार बसविण्यात आली होती. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजेपासून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने विहिरीवरील मोटार चोरून नेल्याचे समोर आले. चोरी गेलेल्या मोटारीची अंदाजे किंमत ५ हजार रुपये असून, मोटारीचा प्लास्टिकचा पाइप तोडून सुमारे ३ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर वैभव भिकाजी गाडे यांनी लोणार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी NCR क्रमांक 0733/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 303(2) व 324(2) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पिकांची चिंता, पाण्याची चिंता अन् आता शेती साहित्याच्या सुरक्षेचीही चिंता

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीनसारखे नगदी पीक अपेक्षेप्रमाणे लागलेले नाही. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळणार की नाही, याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. एकीकडे उत्पादन घटण्याची भीती, दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि त्यात शेतीसाठी आवश्यक असलेली मोटार, पाइप, केबल यांसारख्या साहित्याची चोरी होऊ लागल्याने शेतकरी अक्षरशः चारही बाजूंनी संकटात सापडला आहे.

“आम्ही शेतकऱ्यांनी काय खायचं?”

याबाबत शेतकरी वैभव भिकाजी गाडे यांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना सांगितले, “हे पूर्ण वर्षी शेतीतून काहीच पिकलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी काय खायचं, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. त्यात शेतातील साहित्यांची चोरी व्हायला लागली आहे. चारही बाजूंनी संकटं येत राहिली तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.” शेतकरी वैभव गाडे यांच्या या उद्गारातून ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीबाबतची त्यांची चिंता स्पष्ट होते. पिकाला पाणी नाही, उत्पादनाची खात्री नाही, बाजारभावाची चिंता आणि आता शेती साहित्याच्या सुरक्षेचीही चिंता अशा परिस्थितीत शेतकरी कसा तग धरणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाची प्रतीक्षा, पाण्याची टंचाई आणि शेती साहित्याची चोरी या तिहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला आता प्रशासनाच्या मदतीची आणि संरक्षणाची अपेक्षा आहे.

Share This Article
Exit mobile version