-श्रींच्या गाभाऱ्यातील पुष्पसजावट लक्षवेधी; इंद्रायणी आरतीला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आळंदी (अर्जुन मेदनकर) : इंदिरा एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथील माऊली मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने आळंदीत इंदिरा एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.
आळंदी मंदिरात धुपारतीसाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिरात परंपरेनुसार श्रींची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त संख्येने दर्शन घेता यावे, यासाठी व्यवस्थापक माऊली वीर यांच्या नियंत्रणाखाली सुलभ व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक तसेच मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्त आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले. आळंदीतील वाढती रहदारी लक्षात घेऊन करण्यात आलेल्या प्रभावी वाहतूक नियोजनामुळे भाविक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला. आळंदी पोलिसांनी रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली. यामुळे नागरिक, व्यापारी तसेच पोलीस मित्रांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.
एकादशीनिमित्त इंद्रायणी नदीघाटाची स्वच्छता; इंद्रायणी आरती
अलंकापुरीत इंदिरा एकादशीच्या निमित्ताने इंद्रायणी नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात इंद्रायणीची आरती करण्यात आली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या प्रमुख संयोजिका अनिताताई झुजम, निलम कुरधोंडकर, अनिता शिंदे, सुवर्णाताई काळे, रेखा चव्हाण, सरस्वती भागवत, कौताबाई देवकर, सावित्री घुंडरे, शोभा उबाळे, सुमनबाई सोनवणे, उषा वर्तले, ओम वर्तेले, ज्योती यादव, सुरेखा काळभोर, राजेंद्र जाधव, दत्ताराव तोतरे, संयोजक अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद सुरेश तौर, तारामती गोरे, उषाताई देसले, पुष्पाताई भगवान लेंडकर, दिनकर तांबे, उषाताई वहिले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाच महिला मान्यवरांच्या हस्ते इंद्रायणी नदीचे पूजन व औक्षण करण्यात आले. दर एकादशीला इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी आरती, स्वच्छता, रांगोळी आणि प्रसाद वाटप करण्यात येते. पसायदानाने या उपक्रमाची सांगता होते. या उपक्रमात सर्व भाविक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर आणि संयोजिका अनिताताई झुजम यांनी केले.
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती सेवा समिती, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, आळंदी देवस्थान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने इंद्रायणी नदीघाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात इंद्रायणीची आरती करण्यात आली. एकादशीच्या दिवशी इंद्रायणीची आरती आणि नदीघाट परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम आणि अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आळंदी देवस्थानच्या वतीने रात्री उशिरा वेदमंत्रांच्या जयघोषात इंद्रायणी आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त ॲड. रोहिणी पवार यांच्यासह सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पदाधिकारी, भाविक आणि नागरिक उपस्थित होते.

