– ७ जण गंभीर जखमी; देऊळगाव शहरात शांतता, पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू!
देऊळगावराजा/ सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : कव्वालीच्या कार्यक्रमात लहान मुलांमध्ये बसण्याच्या कारणावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसान रक्ताच्या पाटात झाले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी रात्री तुफान राडा झाला. थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही गट तलवारी आणि धारदार शस्त्रांसह आमनेसामने भिडले. या रक्तरंजित संघर्षात शिंदेसेनेचे विद्यमान नगरसेवक अन्वर शेख आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले असून शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, हे संपूर्ण हत्याकांड पोलीस ठाण्याच्या अगदी गेटसमोरच घडले. काही मिनिटांतच पोलीस ठाण्याचा परिसर युद्धाच्या मैदानात परावर्तित झाला.
-
मृतांची नावे:
- शेख अन्वर शेख अली (विद्यमान नगरसेवक, शिवसेना – शिंदे गट)
- आरिफ पठाण (आरिफ शेख) (कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
या भीषण हल्ल्यात दोन्ही गटांचे ७ ते ८ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तणावपूर्ण शांतता आणि कडेकोट बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अन्वर शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जालन्याच्या शासकीय रुग्णालयात, तर आरिफ पठाण यांचा मृतदेह देऊळगाव राजा येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या अनेक आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मुलांच्या वादातून सुरू झालेल्या या भांडणाला काही जुनी राजकीय वैमनस्याची किनार आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण देऊळगाव राजा शहरात एसआरपीएफ आणि पोलिसांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात आला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

