-९५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी घेतला पाणीपुरवठ्याचा आढावा
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील ९५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अगोदरच उपाययोजना म्हणून तलावांमधील पाणीसाठा तसेच मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा आढावा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्काळ नियोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तलाव व विहिरींची प्रत्यक्ष पाहणी
३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी साखरखेर्डा व शेंदुर्जन मंडळातील सवडद, मोहाडी, शिंदी, राताळी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, शेंदुर्जन, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, पांग्रीकाटे, गोरेगाव, गुंज, सावंगी भगत आणि साखरखेर्डा या भागातील तलावांमधील पाणीसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेतली. साखरखेर्डा गावाची लोकसंख्या लक्षात घेता गावासाठी कोराडी धरण क्षेत्रातील शेवगाव जहागीर येथील विहिरीचीही पाहणी करण्यात आली. गावासाठी नियमित पाणीपुरवठा कसा करता येईल, याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सध्या कोराडी प्रकल्पावरून मोहाडी, सवडद, गुंज, वरोडी आणि साखरखेर्डा या गावांना पाणीपुरवठा केला जातो. महालक्ष्मी तलावातून सावंगी भगत, तर गायखेडी तलावातून शिंदी आणि राताळी गावांना पाणीपुरवठा केला जातो.
काही गावांसाठी टँकरची गरज भासण्याची शक्यता
पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्याची गरज भासू शकते. त्याचबरोबर गायखेडी तलावात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने राताळी आणि शिंदी गावांनाही पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे. राजेगाव तलावातून शेंदुर्जन, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, गोरेगाव, पांग्रीकाटे, कंडारी, भंडारी, जागदरी आणि राजेगाव या गावांसाठी पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी लवकरच नियोजन करून अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
७५ टक्के भरलेले तलावही पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे
हिवरागडलिंग आणि हनवतखेड सिंचन तलाव ७५ टक्के भरलेले असून, या तलावांमधून हनवतखेड, हिवरागडलिंग, वाघाळा, मलकापूर पांग्रा, पोफळ शिवणी, जनुना तांडा आणि आंबेवाडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. नोव्हेंबरपासून अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करून दुष्काळात पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तत्काळ नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांची असेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.
कोराडी धरण व स्वामी विवेकानंद स्मारकाची पाहणी
यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, आज प्रथमच कोराडी धरण पाहण्याचा योग आला. स्वामी विवेकानंद स्मारक पाहण्याची संधी दुरूनच मिळाली. हे स्मारक खरोखरच अप्रतिम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण वऱ्हाडे, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, संजय शिंगणे, लखन राजपूत, शिवानंद वाकदकर, गिऱ्हे यांच्यासह दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

