भरोसा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चिखली (अंकुश पाटील) : जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, भरोसा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा व स्वच्छतेचा दिलेला संदेश, तसेच लालबहादूर शास्त्री यांनी देशसेवा, साधेपणा आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषवाक्यातून दिलेले योगदान विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम

जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा परिसर स्वच्छ केला. परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि स्वच्छतेची सवय अंगीकारणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची ओळख होण्याबरोबरच स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्वही पटवून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. अनिल दोतोंडे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन करवंदे मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या स्वच्छता व स्वावलंबन या गुणांबद्दल माहिती दिली. विलास जवंजाळकर सर यांनी लालबहादूर शास्त्री यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी तसेच त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली. उपशिक्षिका कु. सुनीता खर्डे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. ईश्वरी प्रदीप थुट्टे, प्रगती उबाळे, आदर्श उबाळे, ईश्वरी विजय थुट्टे, आदर्श जाधव, संघर्ष जाधव, ओम थुट्टे, कल्याणी थुट्टे आणि तनुजा हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उबाळे, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांच्या सहभागाने जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Share This Article
Exit mobile version