माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-१०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन

शेगाव (अंकुश पाटील) : माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रादेशिक अध्यक्ष अशोकराव खेडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर शेगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर पटोकार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, प्रल्हाद सुलताने, हिम्मतराव पांचाळ, महिला आघाडीच्या सौ. पूनम पिंपरकर, सौ. मिरगे, पाटील, पांचाळ आदी मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थित होते.

१०० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

शिबिरात सहभागी १०० महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या वयात आरोग्याची नियमित तपासणी करणे, योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी सईबाई मोटे रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष वावगे यांनी आभार प्रदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच आरोग्य क्षेत्रातील सहकार्य करणाऱ्या सर्वांचे योगदान लाभले.

Share This Article
Exit mobile version