“साहेब, काडही १० किलो भरत नाही; सोयाबीनचे दाणे कुठे शोधणार? कपाशी जळायला लागली, दिव्यासाठी वात कुठे मिळणार!”

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हाताशी आलेला घास तोंडात घालण्यापूर्वीच हिरावला; सरसकट पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण तालुका आणि जिल्हा दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. “आज सोयाबीनचे काड डोक्यावर घेतले, तर १० किलो वजन भरत नाही. कपाशीकडे पाहिले तर फुले लागण्यापूर्वीच कळी गळून पडत आहे. दिवा लावण्यासाठी वात कुठून मिळणार?” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आता पाहणी कशाची करता? सरसकट दुष्काळाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे केली.

३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील साखरखेर्डा, गुंज, वरोडी, शेवगा जहांगीर, गोरेगाव, तांदुळवाडी आणि शेंदुर्जन परिसरातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. जून महिन्यात पाऊस झाला नाही. त्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने बहरलेले सोयाबीन जागेवरच कोमेजून गेले. उभी सोयाबीन वाळली असून, दाणा दिसत नसतानाही सोंगणी करावी लागत आहे. काडाचे वजनही अत्यंत हलके झाले आहे. एकरी दोन क्विंटल उत्पादनही मिळाले नसल्याने इतर खर्च सोडाच, सोंगणीचा खर्चही अंगलट आल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कपाशीला पाते लागण्यापूर्वीच कळी गळून पडत आहे. कपाशीचे पीकही सुकत चालले असून, यावर्षी शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी दत्ता गिऱ्हे आणि वामन नाईक यांनी केली.

पंचनाम्याबाबत अधिकाऱ्यांचे आदेश

उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, सर्वच शेतकरी पंचनाम्याच्या निकषात कसे बसतील, याबाबत उपस्थित दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच मंगळवारपर्यंत सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कोणीही या भागात आले नाही, अशी भावना व्यक्त होत असताना संजय खडसे यांनी साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, लखन राजपूत, आनंद राजपूत, गिऱ्हे, शिवानंद वाकदकर, संजय शिंगणे, कृषी अधिकारी छबुलाल कोल्हे, मुन्ना राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी आणि शिवराम मुदमाळी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version