-शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून कॅपॅसिटरचे महत्त्व पटवून देण्याची मोहीम; रोहित्रावरील अचानक वाढणारा विद्युतभार कमी करण्यासाठी मार्गदर्शन
चिखली (अंकुश पाटील) : अनेक शेतकऱ्यांनी मोटार पंपाच्या क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवलेले नाहीत. तसेच मोटार सुरू करण्यासाठी ऑटोस्विचचा वापर केला जातो. वीजपुरवठा सुरू होताच ऑटोस्विचमुळे परिसरातील अनेक मोटारी एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे रोहित्रावरील विजेचा भार अचानक वाढतो. परिणामी वीज ट्रिप होणे, रोहित्र जळणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण होतात.
या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकाद्वारे कॅपॅसिटरचे महत्त्व पटवून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुलढाणा विभागाचे कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर रोजी मेरा खुर्द येथे प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रात्यक्षिकादरम्यान अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले. थ्री-फेज मोटार सुरक्षितपणे चालविण्यासाठी तसेच विजेची बचत करण्यासाठी कॅपॅसिटरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरणच्या वतीने उपकार्यकारी अभियंता जयस्वाल, सहाय्यक अभियंता नाईक, कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण, मेरा वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता आदित्य पडघान, वायरमन राजू शिंदे, संदीप लव्हाळे, दादाराव डोंगरदिवे, ऋषिकेश चोपडे, वाघ यांच्यासह मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार, दैनिक महाभूमीचे पत्रकार अंकुश पाटील, उपसरपंच गुड्डू देशमुख, कासोला बुद्रुकचे सरपंच राजू चव्हाण उपस्थित होते. तसेच शेतकरी गजानन दिलवाले, चंद्रशेखर चव्हाण, संजय चेके, पंढरी काळे, विशंभर वाघमारे, किशोर पवार यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

