जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोरील मटण मार्केटवरून वाद; पोलिसांनी ५० मीटर अंतराची मर्यादा निश्चित केली

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शाळेसमोर दुकाने लावण्याच्या मुद्द्यावरून तणाव; पोलिस व ग्रामपंचायतीच्या हस्तक्षेपाने प्रकरण शांत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेसमोरील मटण व चिकन विक्रीच्या दुकानांवरून सोमवारी वाद निर्माण झाला. शाळेच्या परिसरात पुन्हा दुकाने थाटल्याने दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी अंतर्गत वाद कायम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेसमोर मटण व चिकन विक्रीची दुकाने उभारली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली होती. याबाबत ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून संबंधित दुकाने हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, २९ सप्टेंबर रोजी काही विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुभाजकाजवळ पुन्हा दुकाने लावल्याने वाद निर्माण झाला. काही विक्रेत्यांनी केवळ निवडक दुकाने हटविली जात असल्याचा आक्षेप घेत, इतर दुकानांवरही समान नियम लागू करावेत, अशी भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर काही विक्रेत्यांनी साखरखेर्डा–लव्हाळा मार्गावर व्यवसाय सुरू केल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि काही नागरिकांनी पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती चिघळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली. त्यानंतर दुपारी ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे आणि पोलीस निरीक्षक युवराज रबडे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या ५० मीटर परिसरात कोणतेही मटण किंवा चिकन विक्रीचे दुकान लावू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच संबंधित विक्रेत्यांनी तत्काळ दुकाने हटवून पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली. या निर्णयानंतर काही काळ दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. दरम्यान, शाळेसमोरील मटण मार्केटमुळे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. आजचा वाद शांत झाला असला, तरी भविष्यात पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version