-जानकी देवी विद्यालय व रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या १४ व १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या हॉलीबॉल संघांची विभागस्तरावर धडक
चिखली (राजेंद्र घुबे) : राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी चिखली येथील शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर मुला-मुलींचे हॉलीबॉल सामने पार पडले. यामध्ये देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जानकी देवी विद्यालय व रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या १४ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या तीन संघांनी जिल्हास्तरावर विजय मिळवून विभागस्तरावरील आपले स्थान पक्के केले आहे.
१४ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ विजयी
१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने सहज विजय मिळवत विभागस्तरावरील आपले स्थान पक्के केले. या संघात योगेश जावळे, गणेश पैठणे, रितेश घुबे, शिवराज येते, गणराज परिहार, आर्यन थुट्टे, आदित्य घुबे, समर्थ भागवत, वेदांत घोडकी व गौरव खेडकर या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. एकसंघपणे खेळाचे प्रदर्शन करत या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
१९ वर्षे वयोगटातील मुलांचीही बाजी
१९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत विरोधी संघावर विजय मिळवत विभागस्तर गाठला. या संघात सत्यम मिसाळ, कार्तिक शेळके, प्रथमेश चवरे, ओम घुबे, अभिषेक साखरे, सोहम घुबे, अतुल पेरे, सुमित खेडेकर, सुहास, मनोज घुबे, सुहास खेडेकर, हरिओम डोईफोडे व सुरज वायाळ या खेळाडूंनी सहभाग नोंदवित उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
१९ वर्षे वयोगटातील मुलींचा एकतर्फी विजय
१९ वर्षे वयोगटातील मुलींचा अंतिम सामनाही रंगला. या सामन्यात मुलींच्या संघाने एकतर्फी विजय संपादन करत विभागस्तरावर कूच केली. या संघात दिव्या काकडे, खुशी जाट, पुष्पांजली घुबे, विशाखा घुबे, मयुरी घुबे, गौरी घुबे, शिवकन्या घुबे, अक्षरा डोके, दिशा गोळे, श्वेता थुट्टे, आरती बोर्डे व सारिका जाधव या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या संघाने यापूर्वी तीन वेळा राज्यस्तरावर पोहोचून दमदार कामगिरी करत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आता चौथ्यांदा हा संघ राज्यस्तरावर पोहोचणार काय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात झपाट्याने पुढे येत असलेल्या देऊळगाव घुबे येथील जानकी देवी विद्यालय व रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलने एकाच वेळी हॉलीबॉलच्या तीन संघांना जिल्हास्तरावर विजयी करून विभागस्तरावर पाठविण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे चिखलीसह जिल्हाभरात या कामगिरीचे कौतुक होत आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांचे शिस्तबद्ध प्रशासन, उच्च दर्जाचे क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी आणि पालकांचा समन्वय हे या यशामागील महत्त्वाचे कारण असल्याचे परिसरात बोलले जात आहे. या यशाने हुरळून न जाता जिद्दीने व ताकदीने खेळून राज्यस्तर गाठण्यासाठी जोमाने तयारी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून खेळाडूंना पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्रा. उद्धव घुबे, प्राचार्य बबनराव लांडगे व माजी प्राचार्य हरिदास घुबे यांनी विजयी संघांचे तसेच त्यांचे क्रीडा मार्गदर्शक पंजाबराव गुंजकर व रामेश्वर कऱ्हाडे यांचे अभिनंदन केले आहे.

