-नागपूर करारातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप; विदर्भाचा अनुशेष दूर करून स्वतंत्र राज्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : नागपूर करारातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्याने विदर्भावर झालेला अन्याय आणि विकासाचा वाढता अनुशेष याविरोधात चिखली येथे रविवारी ‘नागपूर करार’ होळी आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलनाचे नेते देविदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारात विदर्भ प्रदेशाच्या समतोल विकासासाठी विशेष तरतुदी व आश्वासने देण्यात आली होती. मात्र, सात दशकांनंतरही या करारातील बहुतांश आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत विदर्भाला दुर्लक्षित ठेवले गेले आहे, अशी टीका यावेळी वक्त्यांनी केली. चिखली येथील आंदोलनस्थळी ‘स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’ आणि ‘विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने विदर्भातील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकासाचा अनुशेष दूर करावा आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागणी मान्य होईपर्यंत आगामी काळात जनजागृती तसेच आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात आत्माराम कुटे, नरहरी थुट्टे, मुरली महाराज येवले, राजू शेटे, सुमंता मोरे, शेषराव पाटील, गजानन घुगे, दिनकरराव घुबे आणि प्रकाश अंभोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

