जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘क्रांतिकारी’चा हल्लाबोल; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसाठी आंदोलन

admin Add a Comment 5 Min Read
5 Min Read

-करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या गेटवर उधळून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा निषेध; रविकांत तुपकरांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बुलढाणा (सुरेश हुसे) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे आणि सरसकट कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी २८ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. डफडे वाजवत आणि सरकारविरोधी घोषणा देत आंदोलकांनी आंदोलन केले. यावेळी करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

“आमदार-खासदार, सचिव आणि कलेक्टरांचे पगार थांबवा आणि तो पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” अशी भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मांडली.

डफडे वाजवत घोषणाबाजी; करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या गेटवर

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आंदोलकांनी डफडे वाजवत आणि सरकारविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलकांच्या हातात हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान आणि सरसकट कर्जमाफीच्या मागण्यांचे फलक होते. शेतकऱ्यांच्या करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळून त्यांच्या नुकसानीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

‘सरकारची आश्वासने फालतू आणि तकलादू’; दुष्काळी जीआरच्या प्रती फाडल्या

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी जीआरवर रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची आश्वासने फालतू आणि तकलादू आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी असे फालतू जीआर काढू नका,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी शासनाच्या दुष्काळी जीआरच्या प्रती फाडून निषेध नोंदवण्यात आला. सोयाबीन उत्पादनासाठी हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी तुपकर यांनी केली.

‘पंचनाम्याचे नाटक नको’; सरसकट कर्जमाफीची मागणी

शेतकऱ्यांचे नुकसान स्पष्टपणे दिसत असताना पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा करू नये, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे आणि नव्याने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. केवळ आश्वासने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करावी, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

‘आमदार-खासदारांचे पगार थांबवा’; तुपकरांचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आपल्या खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली. राज्यातील मोठे प्रकल्प काही काळ थांबवून त्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार-खासदारांचे पगार थांबवून हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटण्यास नकार; तुपकरांसह आंदोलक ताब्यात

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटण्यास तयार नव्हते. आंदोलन अधिक तीव्र होत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी वाहनांमध्ये बसवून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेले. भाषण करण्यापूर्वीच तुपकर यांना ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. तुपकर यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘अभी तो ट्रेलर है’; ३० सप्टेंबरला हिंगोलीत मोर्चा

आजचे आंदोलन हा केवळ ‘ट्रेलर’ असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चातून महाराष्ट्रव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा काढून बळीराजाची ताकद दाखवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात ‘क्रांतिकारी’चे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, अक्षय पाटील, अमोल मोरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील, नरहरी थुट्टे, बंडू शेळके, ‘क्रांतिकारी’चे राजेश शेळके, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, सहदेव लाड, भागवत धोरण, वसीम शेख, अरुण नेमाने, सुधाकर तायडे, भारत वाघमारे, मधुकर शिगणे, ॲड. प्रवीण सुरडकर, भारत गाढवे, किसन नागरे, भगवान मोरे, रामेश्वर आंभोरे, आकाश माळोदे, नितीन सोनटक्के, सुरेश खरात, गजानन डिघोळे, उमेश राजपूत, बाळासाहेब यसकर, अजय गायकवाड, गजानन नाईकवाडे, कृष्णा डोईफोडे, विठ्ठल खेडेकर, आकाश धंदर, समाधान नागवे, गजानन बाप्पू देशमुख, कैलास देशमुख, निलेश राजपूत, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, निलेश गवळी, प्रमोद पाटील, विनोद सरोदे, सुरेश चौधरी, संतोष शेळके, सतीश सुरडकर, गजानन कुटे, आदित्य धाडे, जगन्नाथ लोखंडे, संदीप असाबे, कैलास उतपुरे, दीपक पाटील, नंदू बाहेकर, सचिन कुटे, अरबाज खान, शिवदास खिरोडकार, प्रफुल देशमुख, मारोती मेढे, कडुबा मोरे, संदीप तायडे, मोहम्मद मकसूद, आत्माराम ठाकरे, वैभव जाणे, सिद्धेश्वर चेके, एकनाथ वाघ, सदाशिव जाधव, संदीप पवार, राहुल शेलार, निलेश धोंडगे, देवकाबाई उतपुरे, नंदाबाई जेऊघाले, पंचफुलाबाई, मुरलीधर जेऊघाले, अरुण पन्हाळकर, शैलेश कल्याणकर, सोनोसिंग इंगळे, असलम शेख, दिलीप बोबडे, दीपक पाटील, दिलीप राजपूत, मोहन वेरूळकर, नितीन शिंदे, दीपक देशमुख, श्रीकृष्ण काकडे, नानाभाऊ खटके, शंकर बापू देशमुख, अनंता भाऊ आटोळे, शुभम राऊत यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version