-बँक वाचविण्यासाठी की कारखान्यांची थकबाकी अबाधित ठेवण्यासाठी? : प्रतापराव ढाकणे
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : एकमेकांचे तोंडही न पाहणारे आणि एकमेकांवर जहरी टीका करणारे जिल्ह्यातील प्रस्थापित साखर सम्राट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. हे ऐक्य बँक वाचविण्यासाठी आहे की साखर कारखान्यांची थकबाकी अबाधित ठेवण्यासाठी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केला. कारखाने वाचविण्यासाठीच प्रस्थापित नेते आणि साखर सम्राटांची पळापळ सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे होते. प्रतापराव ढाकणे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. मात्र, केदारेश्वर कारखान्याला जिल्हा बँकेने कधीही कर्जपुरवठा केला नाही. जिल्हा बँक ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील प्रस्थापित १२ साखर कारखान्यांवर बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज व थकबाकी आहे. या थकबाकीची वेळेत वसुली झाली तर बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची बँक टिकविण्यासाठी आगामी निवडणुकीत नेमके कोणते प्रयत्न होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यंदा साखर कारखानदारीसमोर दुष्काळजन्य परिस्थितीचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. साखरेचे दर आणि उत्पादन खर्च यांचा मेळ बसत नसल्याने कारखानदारी अडचणीत आहे. या प्रश्नावर शासनाने नियंत्रणाची भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठीही आपण पुढाकार घेणार असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. जायकवाडीच्या पाण्यापासून शेवगाव-पाथर्डीचा पूर्व भाग वंचित का राहिला, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी लढा उभारला; मात्र त्यांना अपेक्षित राजकीय पाठबळ मिळाले नाही. त्या संघर्षातूनच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली, असेही प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले. अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती आणि खासगी उसाच्या गुऱ्हाळांमुळे कारखान्याला ऊसपुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने कारखान्याला ऊस द्यावा. खासगी गुऱ्हाळांवरही साखर कारखानदारीप्रमाणे नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचे पेमेंट लवकर करण्याबाबत निर्णय झाला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत सभासद, शेतकरी आणि कामगारांनी विश्वासाने साथ दिली. भविष्यातही हा विश्वास कायम ठेवत सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही ऋषिकेश ढाकणे यांनी दिली.
कार्यकारी संचालक किरण शेलार यांनी अहवालाचे वाचन केले. सभेत आयुब शेख आणि बापूराव घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जायकवाडी जलाशयाचे पाणी महत्त्वाचे असून, या प्रश्नासाठी प्रतापराव ढाकणे यांनी प्राधान्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब पोटभरे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष माधवराव काटे, संचालक सुरेशचंद्र होळकर, बापूराव घोडके, डॉ. प्रकाश घनवट, भाऊसाहेब मुंडे, रणजित घुगे, अशोकराव तानवडे, शहादेव पातकळ, सदाशिव दराडे, शिवाजी जाधव, त्रिंबक चेमटे, सुभाष खंडागळे, भाऊसाहेब पोटभरे, जनरल मॅनेजर प्रवीण काळुशे, अर्थ विभागाचे तीर्थराज घुंगरड, तुकाराम वारे, पोपट केदार, शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे, राजाराम केसभट यांच्यासह सभासद, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले, तर आभार डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले.