-साखरखेर्डा येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम; सामाजिक समरसतेचा संदेश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धंदाळे यांनी सामाजिक समरसता आणि धर्मांतरणाच्या मुद्द्यावर आपले विचार व्यक्त केले.
“जोपर्यंत हिंदू समाज जातीय सीमा, अस्पृश्यता आणि उच्च-नीच भेदभावात विभागलेला राहील, तोपर्यंत ना समाज सशक्त होऊ शकतो, ना राष्ट्र सुरक्षित राहू शकते. समाजातील विषमतेमुळे धर्मांतरणाच्या घटना घडतात. विश्व हिंदू परिषदेने सामाजिक समरसतेचा वैचारिक सिद्धांत प्रत्यक्ष कृतीत उतरवून एक व्यवहार्य आंदोलन उभे केले. त्यामुळे धर्मांतरणावरही नियंत्रण मिळवता आले,” असे माधव धंदाळे यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेने सामाजिक समरसतेसाठी उचललेल्या विविध पावलांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, “प्रत्येक हिंदू सहोदर आहे,” हा संदेश संतांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यात आला. जन्माच्या आधारावर कोणीही मोठा किंवा लहान नाही, हा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. “न हिंदू पतितो भवेत्” हा संदेशही संतांच्या माध्यमातून देण्यात आला. याशिवाय ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिलान्यासाची पहिली वीट दलित बांधव रामेश्वर चौपाल यांच्या हस्ते लावण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विश्व हिंदू परिषदेने पूज्य संत, शंकराचार्य आणि धर्माचार्यांना सोबत घेऊन दलित व वंचित वस्त्यांमध्ये पदयात्रा काढल्या. संतांनी वंचित बांधवांसोबत एकत्र बसून भोजन (सहभोज) केले. या माध्यमातून सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे धंदाळे यांनी सांगितले. धर्मांतरित होणाऱ्या हिंदू बांधवांनी संत रविदास यांचे जीवनचरित्र वाचावे. धर्मनिष्ठा काय असते आणि देवभक्तीसोबत राष्ट्रभक्ती कशी करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण संत रविदास यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असेही माधव धंदाळे यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साखरखेर्डा येथील प्रसिद्ध व्यावसायिक दिलीप लखोटिया होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषद जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराम निकम होते.

