शेळगाव आटोळसह चिखली तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती; आदेश निघूनही अधिकारी फिरकेनात, ग्रामस्थ वाऱ्यावर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज ठप्प; बीडीओंनी लक्ष घालून कारवाईची मागणी ऐरणीवर!

चिखली (अंकुश पाटील): चिखली तालुक्यातील मुदत संपलेल्या ५९ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गुलाब खरात यांनी प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, न्यायालयाचा कोणताही स्थगनादेश नसतानाही नियुक्ती केलेले हे प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयांकडे फिरकलेच नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) तातडीने लक्ष घालून शिस्तबद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चिखली प्रशासक आदेश 15 सप्टें.2026

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार (क्र. बुजिप/साप्रवि/ग्रा.पं./टे-४/३८०२/२०२६), चिखली तालुक्यातील मुदत संपलेल्या व निवडणुका न झालेल्या ५९ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी (कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत), कनिष्ठ अभियंता तसेच बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीचा सहा महिन्यांचा कार्यकाळ २४ ऑगस्ट २०२६ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत ही नवी नियुक्ती केली आहे.

या नियुक्ती आदेशांविरोधात किंवा अंमलबजावणीवर माननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही स्थगनादेश (Stay Order) नाही. तरीही, नियुक्ती झालेले अनेक अधिकारी आपापल्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळण्याचे कारण पुढे करत ग्रामपंचायतींमध्ये फिरकतच नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून येत आहेत. ग्रामपंचायतीत प्रशासकच उपस्थित राहत नसल्याने दाखले मिळणे, विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रशासकीय मंजुऱ्या यांसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, प्रशासकांनी तातडीने पदभार स्वीकारून तसा अहवाल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा. तसेच कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन चिखली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) निष्काळजी प्रशासकांना तत्काळ कर्तव्य बजावण्याचे निर्देश द्यावेत आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी ठाम मागणी तालुक्यातून केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version