दुष्काळात नेत्यांची श्रेयवादाची हाणामारी; बळीराजाच्या जळत्या चितेवर राजकारणाची पोळी!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– ‘शेतकऱ्यांच्या जळत्या चितेवर राजकारणाची भाकरी भाजू नका’; प्रवीण गीते यांचा संतप्त इशारा
– पिके करपली, शेतकरी उद्ध्वस्त झाला… तरीही सोशल मीडियावर श्रेय लाटण्यासाठी नेत्यांचे धिंगाणा!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाया गेला आहे व डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्यावरून सुरू असलेली नेत्यांची श्रेयवादाची स्पर्धा अत्यंत संतापजनक असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेते प्रवीण गीते यांनी केली आहे. शेतकऱ्यांची पिके डोळ्यांसमोर जळून खाक होत असताना सोशल मीडियावर सुरू असलेले राजकीय दावे म्हणजे ‘दुष्काळाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच’ आहे, असा परखड सवाल त्यांनी केला आहे.

पावसाअभावी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, घेतलेली कर्जे आणि आगामी हंगामाची चिंता यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असताना, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी ‘दुष्काळ आमच्यामुळेच जाहीर झाला’ याचे श्रेय लाटण्यात राजकीय धुरळा उडाला आहे, असे गीते यांनी म्हटले आहे.

“आमचं घर जळतंय आणि आमच्या व्यथा आम्हालाच ठाऊक आहेत. शेतकऱ्यांच्या जळत्या चितेवर कुणीही राजकारणाची भाकरी भाजू नये,” अशा शब्दांत गीते यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नेत्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात राहण्यापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. फक्त कागदोपत्री दुष्काळ जाहीर करून भागणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही, हे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता प्रशासनाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. प्रशासनाने तात्काळ पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार भरीव नुकसानभरपाई द्यावी. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज व वीजबिल सवलत विनाविलंब मिळावी, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकर सुरू करावेत आणि जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देत गंभीर भागांत चारा छावण्या उभ्या कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.


शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकीय पोळी भाजणाऱ्यांना इशारा देताना गीते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संयमाची आणखी परीक्षा पाहू नका. श्रेयवादाची ही लाजीरवाणी लढाई तातडीने थांबवा आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा. जर तात्काळ ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर वाढत्या शेतकरी असंतोषाचा तीव्र उद्रेक होईल, आणि तो कोणाच्याही हिताचा असणार नाही!” सत्तेची ऊब बाजूला ठेवून कागदी घोषणांपेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर मदत पोहोचवण्याची हीच वेळ आहे, असा इशारा त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिला.

Share This Article
Exit mobile version