- अवर सचिवांपाठोपाठ गुणवंत उमेदवारांनाही बेड्या; रॅकेटमध्ये आणखी बड्या नावांचा संशय!
- सांगली आणि नवी मुंबईतून मध्यस्थांसह आणखी चौघे गजाआड; MPSC पेपरफुटी प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ११ वर!
मुंबई / सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तपासाचा फास आणखी आवळला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून विजय किंगर या उमेदवाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे MPSC पेपरफुटी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.
गुन्हे शाखेने राज्यभरात समांतर कारवाई करत आणखी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साजिद संदे या उमेदवाराला सांगलीतून अटक करण्यात आली. विक्रीकर निरीक्षक (STI) म्हणून कार्यरत असलेला संदीप खलाटे हा प्रश्नपत्रिका पुरवण्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा तपासात संशय आहे. नौदलात सिव्हिल टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेला भैरवनाथ कदम हा मध्यस्थ असून, कदम आणि खलाटे या दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, MPSC च्या गोपनीय कक्षातून तज्ज्ञांनी निवडलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती आर्थिक फायद्यासाठी बाहेर काढण्यात आल्या होत्या. आयोगाचे अवर सचिव अभिजित लेंढवे यांनी मध्यस्थांच्या मदतीने ही प्रश्नपत्रिका लीक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी यापूर्वीच अवर सचिव अभिजित लेंढवे, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, मध्यस्थ अमृत पाटील, गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
सिंदखेडराजा येथील उमेदवाराच्या अटकेमुळे प्रशासकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पेपरफुटी प्रकरणात आणखी काही व्यक्ती आणि उमेदवारांचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्या दिशेने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.

