-२७ सप्टेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; २८ सप्टेंबरला टोकाच्या आंदोलनाचा दिलेला इशारा, शासनाने घेतली दखल
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा निर्णय झाल्याचे स्वागत शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, आजही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याने ते तातडीने थांबवावे, असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, २७ सप्टेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करावा; अन्यथा २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यात आली होती. आता झालेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपल्या निवेदनाची आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेची राज्य सरकारने दखल घेतली, अशी भावना शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या लढ्यात सरकारसमोर ठाम भूमिका मांडणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेताच्या भविष्यासाठी आवाज उठविण्यात आला. शेतकऱ्यांनी आपली व्यथा झाकून ठेवली असती, अन्याय सहन केला असता आणि गप्प बसले असते, तर कदाचित आज हा निर्णय झाला नसता. समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेली पिके, रिकाम्या शेंगा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. उद्ध्वस्त झालेला संसार डोळ्यांसमोर पाहिला. परिस्थिती अत्यंत बिकट असताना शेतकऱ्यांना आधाराची गरज होती; मात्र त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कोणी तयार नव्हते. अशा वेळी शेतकरी योद्धा कृती समितीने शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडत शेवटपर्यंत लढा दिल्याचे समितीने म्हटले आहे.
पत्रकारांच्या योगदानाचे समितीकडून कौतुक
या लढ्यात पत्रकार बांधवांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा आवाज माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविला. शेतकऱ्यांची व्यथा, करपलेली पिके आणि त्यांची मागणी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकारांनी केल्याचे समितीने नमूद केले.
दुष्काळ जाहीर झाला; आता हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
दुष्काळ जाहीर झाला म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत आली असे नाही, अशी भूमिका शेतकरी योद्धा कृती समितीने मांडली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत देण्याची ठाम मागणी समितीने केली आहे. आठ हजार, दहा हजार किंवा बारा हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांचा झालेला उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे तुटपुंजी मदत न देता शेतकऱ्यांचा गेलेला उत्पादन खर्च आणि त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली ठोस मदत मिळावी, अशी मागणी समितीने केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत शेतकरी योद्धा कृती समितीचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. “दुष्काळ जाहीर झाला; आता मदतही ठोस द्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील,” असा इशारा शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे.

