कर्जमाफी झाली, पैसे आले; मात्र पीक कर्ज मिळेना!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-IOB बँकेत विनायक सरनाईक यांचे चार तास ठिय्या आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने कार्यवाहीचे आदेश

चिखली (अंकुश पाटील) : शासनाच्या कर्जमाफीच्या दोन याद्यांमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेतील २८८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येत असतानाही त्यांची कर्जखाती अद्याप बंद झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह इंडियन ओव्हरसीज बँक, शाखा एकलारा येथे २५ सप्टेंबर २०२६ रोजी बँक व्यवस्थापकांना घेराव घातला. बँकेत तब्बल चार तास ठिय्या देत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बँक व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनायक सरनाईक यांनी जाब विचारला. शाखेत २३ कर्ज प्रकरणे प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एकाही पात्र शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज मिळाले नसल्याचा मुद्दा यावेळी समोर आला. याबाबत विचारणा केली असता वरिष्ठांकडून यादी अथवा सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे बँक व्यवस्थापकांनी सांगितल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. आठवडाभरात कर्जखाती बंद करून निल दाखले देणे तसेच नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.

कर्जमाफीची रक्कम मिळूनही खाती बंद नाहीत

शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर ‘हेअर कट’ नियमानुसार तफावत भरून कर्जखाते निकाली काढणे अपेक्षित आहे. मात्र, एक महिना उलटूनही खाती बंद न झाल्याने काही शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. भोरसा-भोरसी येथील गोपाल ढोरे यांच्या कर्जाची मुद्दल व व्याजासह रक्कम सुमारे २ लाख ३५ हजार रुपये होती. शासनाकडून १ लाख ३५ हजार रुपये मिळूनही महिना उलटून खाते बंद न झाल्याने सुमारे ११ हजार रुपये व्याज वाढल्याचे विनायक सरनाईक यांनी सांगितले. कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची खाती तातडीने बंद करून निल दाखले द्यावेत आणि नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सरनाईक यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

चार तासांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. देवरे, तहसीलदार सवडे, एलडीएम तसेच इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. कर्जमाफीची रक्कम मिळूनही खाती बंद न होणे, त्यावर व्याज वाढणे आणि नवीन पीक कर्ज न मिळणे या समस्या त्यांनी मांडल्या. यावर जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी बँक व्यवस्थापकांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

Share This Article
Exit mobile version