बुलडाणा- कोरोनाच्या भयभीत परीस्थितीत आशा वर्कर्सनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली. त्या शहरी आशा वर्कर्स यांना देण्यात येणारा कोरोना प्रोत्साहन भत्ता सुरु ठेवण्यात यावा, याबाबत बुलडाणा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यांना सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड व आशांच्यावतीने 14 जून रोजी निवेदन देण्यात आले.
नगर परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियाना मध्ये ८ आशा वर्कर्स संपूर्ण शहरात गरोदर माता, स्तनदा माता व लहान मुलांचे लसीकरण आणि विविध प्रकारच्या आरोग्याच्या सर्व्हेची कामे करतात. जागतिक आरोग्य संघटनेने आशा वर्कर्स यांच्या कोरोना काळातील कामांची दखल घेतली आहे. संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपूराव्यामुळे मुख्याधिकारी नगर पालिका यांनी १००० रूपये महिना स्थानिक शेष फंडातून देण्याचे कबूल केले. परंतू एकच महिना हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. नंतर कोरोना संपल्याचे कारण सांगून भत्ता बंद केला. ८ लोकांना प्रत्येकी एक हजार रूपये महिन्याचे सर्वांना मिळून फक्त ८ हजार रूपये आशा वर्कर्स ला देण्यासाठी नगर परिषदेजवळ नसल्याची खंत यावेळी कॉ.पंजाबराव गायकवाड व आशांनी व्यक्त केली. शहरी आशा वर्कर्सना कोरोना प्रोत्साहान भत्ता पुर्वरत सुरु ठेवण्यात यावा. तसेच दोन हजार लोकसंख्येच्या मागे एक आशा वर्कर्सची नियुक्ती झालेली असते. परंतू बुलडाणा शहराचा विचार केला तर जवळपास एक लाख लोकसंख्या ग्रुहीत धरली तर ५० आशा वर्कर्सची गरज आहे. हया रिक्त असलेल्या आशा वर्कर्सची भरती प्रक्रिया ताबडतोब सूरू करून सद्यस्थितीत ८ आशावर पडणारा आरोग्याच्या कामाचा ताण कमी करण्याबाबत मुख्याधिकारी गणेश पांडे यांची चर्चा करुन सीटूचे कॉ.पंजाबराव गायकवाड, विजया ठाकरे, रेखा इंगळे, छाया जाधव, सुरेखा गायकवाड यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

