मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; ग्रामपंचायतींना पंचायत समितीचे निर्देश!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सत्याग्रहाची प्रशासनाकडून दखल; पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने कार्यवाहीच्या सूचना

मेहकर (सुरेश हुसे) : मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारींची पंचायत समिती मेहकर प्रशासनाने दखल घेतली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. ज्ञानेश्वर टाले व इतरांनी या प्रश्नावर केलेल्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने संबंधित ग्रामपंचायतींना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

दि. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले तसेच नागरिकांना अनेकदा चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने कार्यवाही

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात मोकाट कुत्र्यांमुळे ग्रामस्थांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याच्या तक्रारी विविध भागांतून समोर येत आहेत. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत संबंधित ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष कार्यवाहीचे निर्देश दिल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता संबंधित ग्रामपंचायतींकडून कितपत प्रभावी कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version