– सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी; महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे ठरतातय मुळावर!
– पिकांची वाळवंटात रूपांतर; चाऱ्याचा प्रश्नही गंभीर; बांधावर नेत्यांची रांग, पण शेतकऱ्यांना ठोस मदतीची आस!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पावसाने दिलेल्या ओढीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून, लाखो हेक्टरवरील पिके वाळू लागली आहेत. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणा भरलेला नाही, तर कपाशीला बोंडच आलेले नाही. पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहता पंचनाम्यांचा फारस उरलाच नसल्याने आता पंचनाम्यांची वाट न पाहता सरकारने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक जिल्ह्यातील बळीराजा मारत आहे.
चालू खरिपात जिल्ह्यात सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टरवर सोयाबीन, १ लाख ३५ हजार हेक्टरवर कपाशी, ९९ हजार हेक्टरवर तूर आणि २८ हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली होती. मात्र, ऐन वाढीच्या काळातच सलग ४० ते ४५ दिवस पावसाने दांडी मारल्याने पिके उभी वाळली आहेत. उडीद आणि मुगाचे उत्पादन तर घरच्या डाळीपुरतेही होणार की नाही, अशी शंका आहे. पिकांसोबत फळबागांनाही याचा मोठा फटका बसला आहे. धरणातील पाणीसाठा खालावला असून नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पातळ्या घटल्याने आणि विजेच्या लपंडवामुळे पिकांना पाणी देणे दुरापास्त झाले आहे. यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने महसूल मंडळ स्तरावर बसवलेली पर्जन्यमापक यंत्रे शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. एखाद्या मंडळातील विशिष्ट गावात पाऊस पडल्यास संपूर्ण मंडळात पाऊस झाल्याची नोंद होते. त्यामुळे पावसाचा खंड असूनही शेजारील इतर गावे नुकसानभरपाईपासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासकीय हालचाली आणि प्रतिक्रिया
- संतोष डाबरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) : “जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून आदेश प्राप्त होताच पुढील आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू केली जाईल.”
- नितेश वाघ (विभागीय समन्वयक, AIC विमा कंपनी) : “अमरावती विभागात पीक परिस्थिती गंभीर आहे. पीक कापणी प्रयोगांनंतर पुढील निर्णय होईल. शासन आणि विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक असून, मार्गदर्शक सूचनांनुसार निर्णय घेतला जाईल.”
- निलेश मडके (तहसीलदार, मेहकर) : “तालुक्यात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त पीक पाहणी झाली असून, पीक कापणी प्रयोगासंदर्भात नियोजन सुरू आहे.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भ दौऱ्यावर असून अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती, पावसाचा परिणाम आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा ते आढावा घेणार आहेत.

