-श्रींच्या गाभाऱ्यातील पुष्पसजावट लक्षवेधी; इंद्रायणी आरतीला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आळंदी (अर्जुन मेदनकर) : परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांनी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभरात सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
पहाटे पवमान अभिषेक; दिवसभर धार्मिक कार्यक्रम
एकादशीच्या पहाटे श्रींच्या मंदिरात वेदमंत्रांच्या जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. याबाबत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी माहिती दिली. भाविकांना कमी वेळेत अधिकाधिक सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. दुपारी महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने परंपरेनुसार प्रवचन व कीर्तन, रात्री धुपारती, शेजारती आणि हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. श्रींचे दर्शन व प्रदक्षिणा करण्यापूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नानासाठीही गर्दी केली.
पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत
एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात धुपारतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी झाली. मंदिरातील पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त सुलभ दर्शन मिळावे, यासाठी व्यवस्थापक माऊली वीर यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात आले. मंदिरातील सुरक्षा रक्षक, सेवक तसेच बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्त व वाहतूक नियोजन केले. आळंदीतील वाढती वर्दळ लक्षात घेऊन करण्यात आलेल्या प्रभावी वाहतूक नियोजनामुळे भाविक व नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला. रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली. यामुळे नागरिक, व्यापारी आणि पोलीस मित्रांकडून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले.
इंद्रायणी घाटाची स्वच्छता करून आरती
परिवर्तिनी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर हरिनाम गजरात इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली. एकादशीच्या दिवशी इंद्रायणीची आरती करून नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यात आल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम यांनी सांगितले. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, संयोजक अनिताताई झुजम, सरस्वती भागवत, अनिता शिंदे, नंदा भांबरे, कौसल्या देवरे, सुवर्णा काळे, तेजस्विनी काळे, उषाबाई पाटील, विमल मुसळे, सुरेखा कुऱ्हाडे, सावित्रा घुंडरे, पुष्पा लेंडघर, काशीबाई अडकिने, तारामती गोरे, जयश्री भागवत, स्वाती सावंत, गोविंद ठाकूर यांच्यासह भाविक व वारकरी उपस्थित होते.

