-वनविभागाची कारवाई; आरोपीस अटक, न्यायालयाने दिला एक दिवसाचा एफसीआर
चिखली (अंकुश पाटील) : अंचरवाडी बीटमधील कक्ष क्रमांक ४३८ मधील सरकारी राखीव वनक्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून गुरे चराई करणाऱ्या आरोपीविरुद्ध वनविभागाने कारवाई केली. या प्रकरणी सिद्धार्थ अर्जुन खिल्लारे, रा. अंचरवाडी याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
२० सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी अंचरवाडी बीट, कक्ष क्रमांक ४३८ मधील सरकारी राखीव वनक्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून वनक्षेत्रातील नैसर्गिक उत्पत्तीची रोपे, झाडे, झुडपे तसेच वन्यजीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होईल अशा प्रकारे गुरे चराई करताना आढळून आला. यावेळी वनरक्षक गजानन पोटे यांनी घटनास्थळी वनकायद्यानुसार कारवाई करून जप्तीनामा व पंचनामा केला आणि वनगुन्हा दाखल केला.
१५ जनावरे जप्त
सदर प्रकरणाचा तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे यांनी केला. तपासात आरोपीविरुद्ध वनगुन्हा निष्पन्न झाल्याने २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीस अटक करण्यात आली. त्यानंतर त्यास प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी, चिखली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाचा एफसीआर मंजूर केला. या कारवाईदरम्यान आरोपीकडून २ बैल, २ गोरे, १ गाय तसेच लहान-मोठ्या १० बकऱ्या, अशी एकूण १५ जनावरे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत २ लाख १५ हजार रुपये असून, सदर जनावरे सध्या वनविभागाच्या ताब्यात आहेत.
वनविभागाच्या पथकाचा सहभाग
ही कारवाई उप वनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक, प्रादेशिक व कॅम्प, बुलढाणा वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), बुलढाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कारवाईमध्ये वनरक्षक गजानन पोटे, अंचरवाडी बीट यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच वनरक्षक नितेश गवई, समाधान झोटे, समाधान शिंदे, गजानन शिंदे, वनमजूर दीपक सोनुने, रवींद्र तायडे, पवन मुळे, ऋषिकेश तुपकर, उखाराम राठोड, सुमित आणि अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला. सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे करीत आहेत.

