-‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत चिखली पोलिसांची कारवाई; १ लाख ३ हजार ३०० रुपयांचा अमली पदार्थ जप्त
चिखली (महिंद्रा हिवाळे) : मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत अमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतुकीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने चिखली पोलिसांनी अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस स्टेशन चिखलीचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाला २१ सप्टेंबर २०२६ रोजी नसीम शेख हसन शेख, वय ३६ वर्षे, रा. इंदिरा नगर, चिखली हा इसम अवैधरित्या गांजा बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदर माहितीची खात्री करून पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, शासकीय पंच, अधिकृत वजन काटा धारक तसेच फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. झडतीदरम्यान आरोपी नसीम शेख हसन शेख याच्या ताब्यातून २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अप. नं. ७६६/२०२६, कलम २०(ब)(ii)(C) एन.डी.पी.एस. कायद्यान्वये चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, प्रवीण मोरे, अश्विनी गाडे, सचिन ठेंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, सुनील राजपूत, निलेश सावळे, ललिता खरात, पंचशीला ससाणे, रुपाली उगले तसेच चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

