५० दिवस पावसाचा खंड; शेतकरी चिंताग्रस्त, तरीही दुष्काळ जाहीर करण्यास शासनाची टाळाटाळ

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-पालकमंत्री जिल्ह्याबाहेर असल्याचा आरोप; ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’ म्हणत चिखलीत ‘भीक मांगो’ आंदोलन

चिखली (अंकुश पाटील) : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सुमारे ५० दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानभरपाई देण्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखली शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली शहरात फिरून नागरिक, व्यापारी तसेच किराणा दुकानदारांकडून छोट्या रकमेच्या स्वरूपात पैसे आणि काजू-बदाम जमा केले. काही किराणा व्यावसायिकांनी काजू-बदाम देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी आर्थिक मदत केली. जमा झालेल्या पैशांतूनही काजू-बदाम खरेदी करण्यात आले.

‘काजू-बदाम खाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर या’

“शेतकरी अडचणीत असताना आढावा बैठका घेऊन काजू-बदाम खाण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती पाहा,” असा उपरोधिक सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी उसनवारी करून, कर्ज काढून आणि मोठ्या खर्चाने पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने हाताशी आलेली पिके संकटात सापडली आहेत, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. केवळ बैठका आणि आश्वासनांऐवजी पर्जन्यमान व प्रत्यक्ष पीक परिस्थितीच्या आधारे तातडीने सर्वेक्षण करून संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली.

हेक्टरी एक लाख रुपये मदतीसह कर्जमाफीची मागणी

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई, हेक्टरी एक लाख रुपये मदत आणि संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जमा करण्यात आलेले पैसे आणि काजू-बदाम चिखली तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरासह ग्रामीण भागात आंदोलनाची चर्चा

“काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या!” या घोषणेसह करण्यात आलेल्या ‘भीक मांगो’ आंदोलनाची चिखली शहरासह ग्रामीण भागात चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या या उपक्रमातून शासनाने बैठकींपेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, असा संदेश देण्यात आला. या आंदोलनात देविदास कणखर, विनायक सरनाईक, समाधान कणखर, नितीन राजपूत, प्रकाश आंभोरे, आत्माराम कुटे, राजू शेटे, गणेशराव थुट्टे, विनोद थुट्टे, भागवत थुट्टे, विष्णू थुट्टे, श्रीकृष्ण थुट्टे, शरद थुट्टे, शिवाजी कोल्हे, सोनू थुट्टे, मुरलीधर येवले, भिकनराव सोळंकी, गणेश थुट्टे, शेषराव शेळके, विनोद थुट्टे, विठ्ठल सोळंकी, अरुण नेमाने, गजानन कुटे, विठ्ठल शेळके, पप्पू लेंडे, सचिन तरमळे, समाधान भूसारी, भागवत थुट्टे, औचितराव वाघमारे, शरद थुट्टे, राजेश शेळके यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

Share This Article
Exit mobile version