शेवगाव तालुक्यात तीव्र दुष्काळ जाहीर करा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आमदार चंद्रशेखर घुले, सभापती क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन; पाणी, चारा, पीक विमा व वीजबिल माफीसह विविध मागण्या

शेवगाव (बाळसाहेब खेडकर) : पावसाअभावी शेवगाव तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यात तीव्र दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि सभापती क्षितिज घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

तालुक्यातील अनेक विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत आटले असून, गावोगावी तसेच वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने टँकर मंजूर करून त्यांच्या पाण्याच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन करावे. तसेच चारा टंचाई लक्षात घेऊन शासकीय चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

खरीप पिकांचे मोठे नुकसान; रब्बी हंगामही धोक्यात

पावसाअभावी बाजरी, कापूस आणि सोयाबीन या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पिके करपली असून, सिंचनाअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. त्यामुळे सन २०२४-२५ मधील रब्बी पीक विमा, चालू वर्षाचे सरसकट दुष्काळी अनुदान आणि खरीप पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

२० गावांना तातडीने पाटाचे पाणी सोडण्याची मागणी

निंबेनांदूर, वाघोली, वडुले खुर्द, ढोरजळगाव ने, ढोरजळगाव शे, गरडवाडी, दिंडेवाडी, आव्हाने खुर्द, आव्हाने बुद्रुक, बऱ्हाणपूर, मळेगाव, सामानगाव, आपेगाव, आखातवाडे, भातकुडगाव, वडुले बुद्रुक, लोळेगाव, अमरापूर, फलकेवाडी आणि वरूर आदी गावांना तातडीने पाटाचे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पूर्व भागातील ३४ खरीप गावांची आणेवारी कमी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, पंडित भोसले, ताहेर पटेल, हनुमान पातकळ, नाना पाटील मडके, डॉ. सुधाकर लांडे, भारत मोटकर, अशोकराव मेरड, विजय पोटफोडे, प्रदीप काळे, संतोष पावसे, गंगाधर चोपडे, रामनाथ राजपुरे, जमीर पटेल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version