-गणेशोत्सवात सामाजिक दायित्वाची जपणूक; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाकडून रक्तसंकलन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सामाजिक कार्यात अग्रेसर राहून श्री शिवाजी व्यायाम शाळेने विविध सण-उत्सवांच्या काळात सामाजिक दायित्वाची परंपरा जोपासली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी श्री शिवाजी व्यायाम शाळा गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात व्यायाम शाळेतील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
‘रक्तदानातून अनेक रुग्णांना मदत’
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, रक्तदान केल्यामुळे किती रुग्णांना सुविधा उपलब्ध होतात आणि त्यांचे प्राण वाचविण्यासाठी मदत होते, हे अधिक महत्त्वाचे आहे. रक्तदान हे सामाजिक दायित्वाचा एक भाग असून, सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून एक प्रकारे देशसेवा केली जात असून, अशा उपक्रमांची आज नितांत गरज असल्याचे युवा सेना नेते योगेश जाधव यांनी सांगितले. यावेळी सरपंच अमित जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन सहभागी युवकांचा उत्साह वाढविला. या शिबिरात सोमेश्वर इंगळे, सुजित राठोड, रितेश देशमुख, विनायक जाधव, राहुल नालिंदे, बालाजी इंगळे, सूरज तळेकर, प्रतीक तायडे, आदित्य पाटील, महेश सर्डे, ओंकार इंगळे, वैभव टाले, आदित्य जगताप, गोपाल सोनुने, विशाल सोनुने, रोहन हाडे, प्रसन्न पाटील, अधिराज जैन, जय कोरडे यांच्यासह अनेक युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवानिवृत्त औषध निर्माता गोपाल मानतकर, शिवाजी शर्मा, राजू जैन, विकास इंगळे आणि गजानन इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

