शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर जळतंय वर्षभराचं पीक

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सोयाबीन वाळले, दाणाही भरला नाही; तरीही दुष्काळ दिसत नाही? कृषी योद्धा कार्यकर्त्यांसोबत विनोद वाघ यांनी केली पाहणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र येथे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनीही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. या पाहणीची माहिती कृषिमंत्र्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिवरखेड पूर्णा येथे शेतकरी संदीप चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाळलेले असून, शेंगांमध्ये दाणे अपूर्ण व अत्यंत बारीक असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. विनोद वाघ यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. केवळ संदीप चव्हाण यांच्या शेतातीलच नव्हे, तर डोंगरमाथ्यावरून फेरफटका मारताना परिसरातील इतर शेतांमध्येही सोयाबीन पिकाची दयनीय अवस्था असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यांतही पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असल्याचे विनोद वाघ यांनी सांगितले. या परिस्थितीची दखल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी घेऊन नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा, यासाठी त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या परिस्थितीची माहिती देऊन सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन दाखवले

पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र येथेही शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन उपटून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. वर्षभर जपलेले पीक हातातून जात असल्याच्या वेदनेतून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनला आग लावून आपली व्यथा व्यक्त केली. “शेतकऱ्याने स्वतःचे पीक जाळण्याची वेळ आली आहे, आता सरकारला आणखी कोणता पुरावा हवा?” असा सवाल शेतकरी योद्धा कृती समितीने उपस्थित केला.

मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे, प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाय, उपप्रदेशाध्यक्ष रघुनाथजी आघाव, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी मुंडे, समिती सदस्य गजाननजी मुंडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version