जऊळका जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-१ लाख ७५ हजारांचा माल लंपास; तोडफोडीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर परिणाम

दुसरबीड (भगवान नागरे) : तालुक्यातील जऊळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी करण्यासोबतच शाळेतील इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. त्यामुळे या घटनेमागे केवळ चोरीचा उद्देश होता की शाळेचे नुकसान करण्याचाही हेतू होता, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी जऊळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश करून चार ते पाच खोल्यांमधील अंदाजे १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. तसेच शाळेच्या पोषण आहाराच्या स्टॉक रूममधून तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, मटकी, वाटाणा, एक लिटर तेलाची २४ पाकिटे तसेच विविध मसाल्याचे पदार्थ असा अंदाजे ७ हजार रुपयांचा मालही चोरीस गेला. अशा प्रकारे एकूण सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.

चोरीपेक्षा तोडफोडीचे प्रमाण अधिक

या घटनेची गंभीर बाब म्हणजे चोरीस गेलेल्या साहित्याव्यतिरिक्त शाळेतील इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्यांचा उद्देश केवळ मौल्यवान वस्तू चोरून नेण्यापुरता मर्यादित होता का, की शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचाही हेतू होता, असा प्रश्न पालक व ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. मात्र, या संशयामागील नेमके तथ्य तपासातूनच स्पष्ट होणार आहे. शाळेतील एलईडी, संगणक आणि अन्य दृकश्राव्य साधनांचे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या डिजिटल शिक्षणाच्या काळात इलेक्ट्रॉनिक साधने ही अध्यापन प्रक्रियेतील महत्त्वाची साधने बनली आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्याची चोरी तसेच इतर साहित्याची तोडफोड झाल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय शालेय पोषण आहारासाठी ठेवण्यात आलेला साठाही चोरीला गेल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांवर परिणाम करणारा असल्याची भावना पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणी जऊळका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश सुभाष नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप. क्र. ३३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३४ (१), ३०५ (ए) आणि ३२४ (४) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार संजय मार्तंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विष्णू मुंढे पुढील तपास करीत आहेत. शाळेत अज्ञात व्यक्तींनी प्रवेश कसा केला, चोरीस गेलेले साहित्य कुठे नेण्यात आले, या प्रकारात किती जणांचा सहभाग आहे आणि चोरीसोबत करण्यात आलेल्या तोडफोडीमागील नेमका उद्देश काय होता, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

‘ज्ञानमंदिराच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहावे’

जऊळका येथील जिल्हा परिषद शाळा ही गावासाठी महत्त्वाची शैक्षणिक संस्था असून, शाळेत अशा प्रकारची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एलईडी, संगणक व अन्य साधनांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. शाळेची सुरक्षितता वाढवावी आणि या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शाळा हे गावाचे वैभव आणि ज्ञानमंदिर असल्याने भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version